सोलापूर, २१ फेब्रुवारी २०२३ : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. २२ फेब्रुवारी) राज्यातील सर्व जिल्ह्यांत विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याच्या निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोलापुरात घेतला आहे. यासंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे प्रत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे.
सध्या शेतकऱ्यांना वेळेवर आणि आवश्यक तेवढी वीज उपलब्ध करून दिली जात नाही; तसेच शेतकऱ्यांच्या वीजबिलात ३७ टक्के वाढ केली आहे. मुळात शेतकरी आर्थिक अडचणीत असतानाही वीज वितरण विभाग आणि महापारेषण यांच्या वतीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू झालेली आहे; तसेच शेतीमालाला हमीभाव मिळत नाही.
सोलापुरात कांदा, साखर यांसारख्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही, तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून जात असलेल्या सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग व रिंग रोडसाठी आवश्यक असलेल्या जमिनी कवडीमोल किमतीने शासनाकडून संपादित केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, अशी आमची मागणी आहे. तर मराठवाडा, विदर्भामध्ये कापसाची परिस्थिती दयनीय आहे.
यामुळे अतिवृष्टी, पीक विमा याची नुकसानभरपाई शासनाने शेतकऱ्यांना दिलेली नाही. अशा अनेक विषयांवर राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहान राजू शेट्टी यांनी केले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर