मुंबई-गोवा महामार्गावर एसटी-मिनी बसमध्ये अपघात; दोन गंभीर, सहा जखमी

माणगाव (जि. रायगड), २३ फेब्रुवारी २०२३ : जितकी वर्षे काम रखडले आहे तितकी वर्षे मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा व जीवघेणा बनला आहे. मागील काही दिवसांपूर्वी माणगाव तालुक्यातील रेपोली हद्दीत झालेल्या भीषण अपघातात एका बालकासह ९ जण असा एकाच कुटुंबातील १० जणांना जीव गमवावा लागला होता आणि २२ फेब्रुवारीच्या रात्री मुगवली गावच्या हद्दीत एस्सार पेट्रोलपंपच्या समोर रात्री १:१५ वाजण्याच्या सुमारास एसटी बस व टेम्पो ट्रॅव्हलर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला आहे; मात्र जीवितहानी टळली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे, की मुंबई-गोवा महामार्गावरून पुण्याकुडून महाडकडे चाललेली मिनी बस टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच- १४, सीडब्ल्यू- ५५०८) व महाडकडून मुंबई, नालासोपाराकडे जाणारी एसटी बस (एमएच- २०, बीएल- १८३४) यांचा अपघात झाला. यामध्ये टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसमधील एकटाच असणारा चालक दिनेश घबाड (रा. काळेवाडी, पिंपरी-चिंचवड, पुणे) हा व एसटी बसमधील प्रवासी विनायक विष्णू साटम हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये मिनी बसचालक यांना पुणे येथे, तर गंभीर जखमी एसटी प्रवासी यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. यांच्यासह एसटी बसमध्ये असणारे इतर सहा प्रवासी देखील जखमी झाले.

या अपघाताचे वृत्त समजताच माणगाव पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार रावसाहेब कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविले. सदर अपघाताची नोंद माणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलिस करीत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रमोद जाधव.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा