पुणे, २७ फेब्रुवारी २०२३ : आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियन महिला संघ विक्रमी सहाव्यांदा विश्वविजेता बनला आहे. अर्थात, ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाचा षटकार लगावला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने बेथ मुनीच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डटने अर्धशतकी खेळी केली; मात्र तिची झुंज अपुरी ठरली. या सामन्यात आफ्रिकेला १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली.
ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने ५३ चेंडूंत नाबाद ७४ धावांची खेळी केली. याशिवाय एश्ले गार्डनरने २१ चेंडूंत २९ धावा केल्या. एलिसा हिली १८, तर मेग लॅनिंग १० धावांवर बाद झाल्या. ऑस्ट्रेलियाने हिली बाद झाल्यानंतर एश्ले गार्डनर आणि ग्रेस हॅरीस यांना बढती दिली होती. ग्रेस हॅरीस फारशी कमाल करू शकली नाही. ती १० धावा करून बाद झाली. एलिस पेरी ७, तर वॅरेहम शून्यावर बाद झाली. दक्षिण आफ्रिकेच्या शबनीम इस्माईल आणि कॅपने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर मलाबा आणि ट्रायनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरवात अडखळत झाली. ब्रिट्स फक्त १० धावांवर बाद झाली. त्यानतंर कॅप ११, तर सुन लुस २ धावांवर बाद झाली. यानंतर क्लो ट्रायन आणि लॉरा वोल्वार्डटने अर्धशतकी भागिदारी केली; मात्र लॉरा वोल्वार्डट बाद झाल्यानतंर दक्षिण आफ्रिकेच्या आशा संपुष्टात आल्या.
ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीची धडाकेबाज कामगिरी
ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज सलामीवीर बेथ मुनी पुन्हा एकदा आपल्या संघासाठी सामना विजेता ठरली. आपला दमदार फॉर्म कायम ठेवत तिने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५३ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. यादरम्यान तिने ९ चौकार आणि १ शानदार षटकारही लगावला. तिच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने विजय मिळविला.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील