नाशिक, २ मार्च २०२३ : नाशिक जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांबाबत अनेक तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तालुका अधिकाऱ्यांकडे वर्ग केल्या असल्या तरी तालुकास्तरावरून एकाही तक्रारीचा अहवाल प्राप्त होत नाही. असे वेळोवेळी घडत आहे. यावरून कळवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार आणि चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी विधान भवनात प्रश्न विचारला असून, त्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे माहिती मागविण्यात आली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून बोगस डॉक्टरांबाबत जिल्हा परिषद टाळाटाळ करीत असल्याचे बातम्यांमधून समोर आणले जात होते. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यादेखील चौकशी करणार असे सांगण्यात आले होते. आता थेट विधान भवनातूनच माहिती मागविली गेल्याने जिल्हा परिषदेत हा चर्चेचा विषय झाला आहे.
आमदार पवार आणि आमदार डॉ. आहेर यांनी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला असून, यामध्ये कळवण, इगतपुरी, नांदगाव, मालेगाव, सिन्नर, निफाड आणि दिंडोरी आदी तालुक्यांची माहिती मागविली आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याबाबतीत माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. या प्रकारे जर आरोग्य विभाग बोगस डॉक्टरांना पाठीशी घालत असेल तर हा सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ ठरणार आहे. याबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घेत या डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी धोरण आखले पाहिजे, असे सांगण्यात आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर