विशाळगड, २१ मार्च २०२३: जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय कर्मचारी संपावर आहेत. कालपासून संपाचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. संपाबाबत अजूनही तोडगा निघालेला नाही. शासकीय कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यांनी दुसऱ्या आठवड्यातील आंदोलनाची रूपरेषाही ठरवली असून काल शाहुवाडी तहसिल कार्यालयासमोर “थाळीनाद” आंदोलनाद्धारे शासनाचं लक्ष वेधण्यात आलं.
‘एकच मिशन जुनी पेन्शन’, ‘पेन्शन आमच्या हक्काची… नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी शाहूवाडी पंचायत समिती व तहसीलदार कार्यालय परिसर दणाणून टाकला. येथे सुमारे ७२९ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाचं निवेदन नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांनी स्वीकारलं, पंचायत समिती समोर जो पेन्शन देईल त्यालाच मत देईल, अशी शपथ घेण्यात आलीय.
मोर्चात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ, आयसीडीसी विभाग, शिक्षक संघटना, कृषी महासंघ, प्राथमिक शिक्षक संघटना, आरोग्य संघटना, पाटबंधारे कर्मचारी संघटना, वनविभाग कर्मचारी आदिंसह विविध विभागांतील संघटनांचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर