नाशिक, २४ मार्च २०२३: नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने झालेल्या पीक पंचनाम्यांचे अंतिम अहवाल आज शुक्रवारी (दि.२४) हाती येणार आहेत. या अहवालानुसार नुकसान भरपाईसाठी शासनाकडं आर्थिक मदत मागण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाधर डी. यांनी दिली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळीच्या भरपाईसाठी पहिल्या टप्प्यात २ कोटी ५८ लाखांची मागणी राज्यस्तरावर केल्याचं त्यांनी सांगितलंय.
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा चिंतातूर झालाय. जिल्ह्यात दि.५ ते ८ मार्च या कालावधीत आलेल्या अवकाळीने ३२३ गावांमधील १.७४६ हेक्टरवरील पिकांचं मातेरे झालंय. त्यामुळं ३ हजार ९४६ शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक फटका निफाड व नाशिकला बसला असून त्यामुळं या दोन्ही तालुक्यातील द्राक्षपीक धोक्यात आलंय. प्रशासनाने पिकांचे पंचनामे पूर्ण करीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने २ कोटी ५८ लाख रुपयांची मागणी नोंदवली आहे.
जिल्ह्याला गेल्या आठवड्यातही अवकाळीने तडाखा दिला. त्यामुळं हजारो हेक्टरचं नुकसान झालंय. महसूल यंत्रणा कृषी विभागाच्या मदतीने पंचनामे करत आहे. शुक्रवारी ( दि.२४) त्याचा अंतिम अहवाल हाती येईल. त्यानुसार नुकसान भरपाईच्या अनुदानासाठी शासनाकडं प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाधर डी. यांनी दिलीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर