भाजप खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन

पुणे, २९ मार्च २०२३:- पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड वर्षांपासून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. गिरीश बापट यांची तब्येत काही दिवसांपासून खालावत चालली होती. आत्तापर्यंत त्यांच्यावर घरीच उपचार चालू होते. मात्र, आज त्यांना दीनानाथ मंगेशकर या पुण्यातील रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं. गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती जगदीश मुळीक यांनी दिली असून, गिरीश बापट यांच्या मागं पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

गिरीश बापटांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं. परंतु, एका फायटर प्रमाणं लढलेल्या या व्यक्तिमत्त्वाची झुंज आज थांबली. कसबा विधानसभा पोट निवडणुकीत गिरीश बापट एका मेळाव्यात सहभागी झालेले पाहायला मिळाले. त्यामुळं त्यांच्या या साहसाला दाद देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

पुणे शहराच्या राजकारणात गेली ४० वर्ष अतिशय सक्रिय असलेले बापट अचानक गेल्याने पुणे शहराच्या राजकारणात समाजकारणात आणि पुणे महाराष्ट्र भाजपाच्या कार्यातील त्यांची उणीव नेहमी भासणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. ‘त्याचप्रमाणं गिरीश बापट हे अत्यंत मनमिळावू आणि लोकप्रिय नेते होते’ असं म्हणत विनायक राऊत यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा