चंद्रपूर, ३० मे २०२३: चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे दिल्लीतील मेदांता रुग्णालयात निधन झाले. ४७ वर्षीय धानोरकर यांची प्रकृती गेल्या दोन-तीन दिवसांपासून खालावल्याने त्यांना नागपूरहून मेदांता रुग्णालयात नेण्यात आले होते. २६ मे रोजी धानोरकर यांच्या किडनी स्टोनचे ऑपरेशन झाले. यानंतर त्रास वाढल्यावर त्यांना नागपूरहून दिल्लीला हलवण्यात आले. मात्र सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळू धानोरकर यांच्यावर ३१ मे रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यासाठी त्यांचे पार्थिव दिल्लीहून चंद्रपूरला त्यांच्या निवासस्थानी वरोरा येथे आणण्यात येणार आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे.
त्याचबरोबर आठवडाभरात घरात दोन मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बाळू धानोरकर यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा या आमदार आहेत. बाळू धानोरकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती. २००९ मध्ये शिवसेनेने चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथून बाळू धानोरकर यांना तिकीट दिले होते, मात्र ते निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना या जागेवरून तिकीट देण्यात आले आणि ते येथून विजयी होऊन आमदार झाले. मात्र, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या हजेरीनंतरही शिवसेना वाढविली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड