आळंदी(पुणे) ४ जून २०२३ : माऊलींच्या पायी वारी पालखी सोहळ्यात लागमाऱ्या विविध साहित्यांनी संस्थानचे भांडारगृह सज्ज झाले आहे. यंदाच्या वारीत ट्रकमध्ये देवस्थानचे कपाटे वापरण्याच्ये निर्णय घेतला आहे. त्यामुळे चालू प्रवासात देखील हवी ती वस्तू हवी त्या वेळी काढता येणार आहे. एकंदरीत फिरते भांडारगृहच यंदाच्या वारीत असणार आहे.
पालखी सोहळ्यात माउलींच्या रथासोबत असणारे पदाधिकारी, सेवकवर्ग, कर्मचारी यांच्या राहण्याची, जेवणाची सोय, त्यासाठी लागणारे साहित्य यांची नोंद भांडारगृहात करण्यात येते व त्याप्रमाणे वारी काळात संपूर्ण व्यवस्था पाहिले जाते. भक्तनिवास या ठिकाणी भांडारगृह असून याठिकाणी सोहळ्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांची तजवीज करण्यात येते.
तब्बल एक महिन्याच्या प्रवासासाठी माउलींची पालखी निघणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत भांडारगृहातील साहित्य एका ट्रकमधून पालखी तळावर पोहोचलेले असते. त्यानूसार यंदा पालखी सोहळ्याच्या प्रवासात लागणारी स्वयंपाक भांडी, अब्दागिरी, शाली, पडदे, किराणा माल, पत्रावळी, गॅसशेगडी, सिलेंडर आदी साहित्यांची भांडारगृहात जमावाजमव करण्यात आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर