मुंबई १३ जून २०२३: जुहू बीचवर समुद्रात पोहणाऱ्या पाचपैकी चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. हे पाचही जण समुद्रात पोहत सुमारे अर्धा किलोमीटर आत गेले होते. बुडताना निदर्शनास आल्याने तेथील मच्छिमारांनी एका मुलाला वाचवले, मात्र उर्वरित चार जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाच्या गोताखोरांना पाचारण करण्यात आले आहे. या चार मुलांचा शोध सुरू आहे. त्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी जुहू बीचवर पाच मुलं समुद्रात पोहत होती. या सर्व मुलांचे वय १२ ते १५ वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, समुद्राच्या पाण्यात पोहत चकरा मारत असताना, ही पाच मुले सुमारे अर्धा किलोमीटर आत गेली. दरम्यान, एका लाटेसोबत ते सर्वजण वाहून खोल पाण्यात गेले.
मच्छीमारांचा एक गट तिथे मासेमारी करत होता. या मुलांना पाण्यात बुडताना पाहून मच्छीमारांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत चार मुले बेपत्ता झाली होती. एक मुलगा दिसल्यावर मच्छिमारांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले.लगेच या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी नौदल आणि तटरक्षक दलाची मदत घेतली. चार बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाच्या गोताखोरांना पाण्यात उतरवण्यात आले. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार,जलद बचाव कार्य करण्याच्या उद्देशाने गोताखोरांची एक टीम देखील स्टँडबायवर ठेवण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड