वॉशिंग्टन,अमेरिका १७ जून २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २४ जून या कालावधीत अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत. गेल्या ९ वर्षांतील त्यांचा हा ८वा अमेरिका दौरा असेल. भारत आणि अमेरिकेत त्यांच्या दौऱ्याची तयारी जवळपास पूर्ण झालीय. या कार्यक्रमांतर्गत वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊसच्या बाहेर भारताचा तिरंगा फडकताना दिसला.
व्हाईट हाऊस बाहेर फडकणारा तिरंगा पाहून तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनाही त्याचा अभिमान वाटतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन आणि फर्स्ट लेडी जिल बाइडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी अमेरिकेला जात आहेत. यादरम्यान ते किमान डझनभर कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दौरा अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जात आहे, जो भविष्यातील संबंधांचा पाया रचण्यात मोठी भूमिका बजावेल. यादरम्यान ते अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनालाही संबोधित करणार आहेत.
२१ जून रोजी पंतप्रधान मोदी प्रथम न्यूयॉर्कला पोहोचतील आणि संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यांच्या नेतृत्वाखाली येथे योग सत्राचे आयोजन करण्यात आलय. यानंतर पीएम मोदी वॉशिंग्टन डीसीला जातील आणि जो बाइडेन यांच्यासोबत डिनरला उपस्थित असतील. दुसऱ्या दिवशी त्यांचे व्हाइट हाऊसच्या दक्षिण लॉनमध्ये अधिकृतपणे स्वागत केले जाईल आणि यानंतर द्विपक्षीय बैठका, शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा होईल. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान त्यांची अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयासोबतही बैठक होणार आहे. याशिवाय मान्यवरांसाठी इतर कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड