पिंपरी १९ जून २०२३: निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्पालगतची विकसकांना दिलेली जागा, पीएमआरडीएने शिवजयंती साजरी करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. या जागेच्या ऐवजी, पर्यायांचा विचार करून दुसरी पर्यायी जागा विकसकाला द्यावी, त्यासाठी सकारात्मक तोडगा काढावा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांना दिले.
निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्पालगतच्या पीएमआरडीएच्या जागेची विक्री प्रक्रिया रद्द करुन ही जागा शिवजयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि इतर सर्व सार्वजनिक उपक्रमासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावी, अशी मागणी शिवजयंती समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकतीच करण्यात आली होती.
सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती समितीच्या वतीने, थेरगाव येथे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मध्यस्थीने राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली. त्या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले. या भेटीला सर्व पक्षांचे नेते, उपनेते, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर