नाशिक १९ जून २०२३ : महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये नेहमीच रस्सीखेच सुरु असते. ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे या आता शिंदे गटांमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडे असलेले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आल्याने मविआमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा केलाय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही माध्यमंशी बोलताना ज्यांची सदस्य संख्या जास्त त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार असे सूचक वक्तव्य केले.
ठाकरे गटाच्या विधान परिषद सदस्य मनिषा कायंदे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची सदस्य संख्या एकने कमी झाली. आता ज्याचे सदस्य जास्त त्याच्याकडे विरोधी पक्षनेते पद असावे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली, त्याचबरोबर विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर आम्ही दावा करणार असल्याचे वक्तव्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही केले आहे. १००℅ विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदावर आम्ही दावा करू, असे ते म्हणाले.
विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पद एकनाथ खडसे यांना द्यावे अशी आमची मागणी असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. मनिषा कायंदे यांना २०१८ साली शिवसेनेकडून विधान परिषदेवर पाठवले, आता त्या ठाकरे गटातून शिंदे गटाकडे गेल्या आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरुन महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासून कलह होता.अंबादास दानवे यांना निवडीचे पत्र दिल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाराज होते. यामध्ये त्यावेळी काँग्रेसने तर टोकाचीच भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी शिवसेनेने इतर पक्षांनाही विश्वासात घेणे गरजेचे होते, म्हणत नाराजी व्यक्त केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर