मुंबई, ३ जुलै २०२३ : महाराष्ट्राच्या राजकारणात काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भूकंप घडवून आणला. दुपारी अचानक अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला एकच उधान आले.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची, तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ दिग्गज नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.हा शरद पवार यांच्यासाठी एक राजकीय झटका आहे. राष्ट्रवादीच्या फुटीवर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘नांदा सौख्यभरे’, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याचबरोबर अनेक उलट सुलट चर्चानाही उधाण आले. शिंदे फडणवीस सरकारचा होणार होणार म्हणून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अजूनही तसाच आहे. तर आता राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शपथ घेतली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे पुढे काय चित्र तयार होते हे पाहणे कुतूहलाचे असेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर