नेकनूर, ४ जुलै २०२३: बीड तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ धूळे-सोलापूर या महामार्गावर, मांजरसुंभा येथील बीडकडे जाणाऱ्या उड्डाणपूल संपतो त्या ठिकाणी रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा नव्हे तर रस्त्यावर भलंमोठं भगदाडच पडल्याच दिसून येतय. रात्री अपरात्री वाहनधारकांच्या लक्षात न आल्यास मोठ्या अपघातांची शक्यता आहे.
संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने दुरुस्ती करून खड्डा बुजविण्यात यावा अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी बीड, यांच्यामार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद अरविंद काळे यांना केली आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
अपघात होण्यास अतिवेग हे जरी मोठ्या प्रमाणात कारण असले तरी वाहनधारकांचा निष्काळजीपणा, ओव्हरटेक करणे, चुकीच्या दिशेने प्रवेश अथवा वाहन चालवणे दिनदर्शिका नसणे त्याचबरोबर निकृष्ट दर्जाचे रस्ते, जागोजागी रखडलेले अपुर्ण रस्ते व खड्डे पडणे हे सुद्धा अपघाताचे प्रमुख कारण बनले आहे. या ठिकाणी वारंवार अपघात घडले असले तरी रस्ता कंपनीकडून सुधारणा केली जात नसल्याने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर