जेजुरी, १३ जुलै २०२३: महाराष्ट्र शासनाच्या वतीने जेजुरी येथे आज ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. या कार्यक्रमांची सुधारित तारीख लवकरच देण्यात येईल, असे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी येथील पालखी मैदानावर साठेआठ एकर जागेत १ लाख ५७ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचा मंडप उभारण्यात आला आहे. दरम्यान पुणे-बारामती रस्त्यावर जड, अवजड व इतर वाहतूक, तसेच बाजारदेखील बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. दुसरीकडे सुमारे ६०० एसटी बस व इतर वाहनांसाठी तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.
जेजुरी-मोरगाव रस्त्यानजीक हेलिपॅड बनविण्याचे कामदेखील पूर्ण झाले होते. मात्र ऐनवेळी काही अपरिहार्य कारणांमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने पत्राद्वारे कळविण्यात आले. त्यामुळे पालखी मैदानात उभारलेला मंडप तसेच राबविण्यात आलेली शासकीय यंत्रणा यांच्या खर्चाला जबाबदार कोण? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर