ठाणे, १४ जुलै २०२३: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात नोकरीचे आमिष दाखवून ३७ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी चार अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित महिला पाडळे गावची रहिवासी आहे.
डायघर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मार्च २०२३ मध्ये बेरोजगार झाल्यानंतर पीडित मुलगी नवीन नोकरीच्या शोधात होती. यासाठी तिने जॉब पोर्टलवर आपली माहिती शेअर केली. काही वेळातच, तिला सेलिब्रिटींचे व्हिडिओ लाईक करण्याबद्दल ऑनलाइन जॉब मेसेज आला. तिने सांगितले की, प्रत्येक व्हिडिओ लाइक करण्यासाठी ठराविक रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. एक प्रयोग म्हणून तीला आश्वासनाप्रमाणे काही रुपयेही देण्यात आले.
यानंतर तीला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले. या आमिषाला बळी पडून तिने ३७ लाख तीन हजार ७६० रुपये गुंतवले, मात्र त्याबदल्यात कोणताही परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने चार जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, कलम ४१९, ४९० आणि भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड