अर्थ खात्याची प्रत्येक फाईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नजरेखालून जाणार, गुलाबराव पाटील यांचे विधान

जळगाव, १६ जुलै २०२३ : शिंदे गटाच्या प्रखर विरोधानंतरही अखेर अर्थमंत्रीपद अजित पवार यांच्याकडेच गेले आहे. अजितदादांकडे अर्थखाते गेल्याने शिंदे गटात अजूनही अस्वस्थता आहे. महाविकास आघाडीत अजित पवार यांच्याकडे अर्थखाते होते. त्यावेळी अजितदादांनी शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला होता. राष्ट्रवादीच्या आमदारांना मोठ्या प्रमाणावर निधी दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती या सरकारमध्ये होऊ शकते, अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांना आहे. त्यामुळेच ही अवस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे अजित पवार खरोखरच शिंदे गटाला निधी देताना हात आखडता घेणार की मुक्त हस्ते निधी देणार याची जोरदार चर्चा रंगली आहे.

अजित पवार यांना अर्थखाते दिल्यानंतर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यावर विधान केले आहे.आता सत्तेत तीन वाटेकरू झाले आहेत. अजित पवार हे मातब्बर नेते असल्यामुळे त्यांना सन्मानाचे खाते देणे गरजेचे होते, असे मत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केले. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

अर्थ खाते जरी अजित पवारांकडे असले तरी आता मागच्या काळासारखे होणार नाही. अर्थ खात्याकडे येणारी प्रत्येक फाईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नजरेखालून जाणार आहे. त्यामुळे मागच्या काळात जे असंतुलित काम होत होते, ते या काळात होणार नाही. त्यामुळे मागच्या काळात जे गैरसमज झाले होते, ते कामाच्या रूपाने बाहेर येतील. हा निर्णय योग्य असल्याचे सांगत अजित पवारांकडे अर्थ खाते देण्यात आल्याचे समर्थनही गुलाबराव पाटील यांनी केले.

मागच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. पण त्यांना प्रशासनाचा फारसा अनुभव नव्हता त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थ खाते आणि उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे असल्याने निधी मिळण्याबाबत आमदारांना अडचणी येत होत्या. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने शिंदे गटाला वाटा सारखाच मिळेल. त्यात कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही याची खात्री आम्हाला आहे, असे ते म्हणाले. अर्थ खाते अजित पवारांकडे असले तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने आमदारांना काहीच अडचणी येणार नाहीत, असेही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा