नाशिक, १७ जुलै २०२३ : सध्या उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवलाय. दिल्लीसह उत्तराखंड, हिमाचल, प्रदेश, उत्तराखंड,पंजाब आणि हरियाणा येथील नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला. माणसाचे काळीज दुभंगणारे व्हिडिओ सोशल मीडिया आणि माध्यमांमधून पाहायला मिळाले. बस, ट्रक पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना दिसले. पाण्याच्या प्रचंड दबामुळे अनेक घरे, इमारती पावसामुळे उध्वस्त झाल्या. उत्तरेकडच्या राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. अनेक नागरिक मृत्युमुखी पडले. दिल्लीमध्ये १९७८ नंतर यमुना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उत्तरेतील राज्यात ही स्थिती असताना त्या तुलनेत महाराष्ट्रात विदारक चित्र पाहायला मिळत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सोडल्यास राज्याच्या अन्य भागात,खान्देश, विदर्भ, नाशिक, मराठवाडा येथे अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही.संपूर्ण शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. कारण पावसावर येणाऱ्या शेती पिकांवर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. नाशिक हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नाशिकला दरवर्षी जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळतो. गोदावरी काठची मंदिर पाण्य़ाखाली जातात. संपूर्ण नाशिक जलमय असते, या ठिकाणी पूर सदृश्य स्थिती असते. परंतु यावेळी मात्र चित्र वेगळे आहे.
नाशिक जिल्ह्याला पावसाने ओढ दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे प्रशासन, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गंगापूर धरणात ३९%, कश्यपी २०%, तर गौतमी धरणात १५% पाणीसाठा शिल्लक आहे. शहरात आतापर्यंत केवळ ११३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यातील ही स्थिती चिंता वाढवणारी आहे. पुढच्या काही दिवसात नाशिकमध्ये पाऊस झाला नाही, तर गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. मागच्या वर्षी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गोदावरीला पूर आला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर