मुंबई, १ ऑगस्ट २०२३ : सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर, आता राज्यातील आरोग्य केंद्रापासून ते सरकारी रुग्णालयात अगदी केसपेपर काढण्यापासून ते विविध चाचण्या नि:शुल्क केल्या जाणार आहेत.
यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केला असून लवकरच तो मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी आणला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ७० कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे. आरोग्य सेवा ही महत्त्वाची व आपत्कालीन सेवा आहे. राज्यभरामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागांतअंतर्गत विविध स्तरांवर विविध प्रकारच्या आरोग्य संस्था काम करीत आहे.
राज्य सरकारची राज्यात १० हजार ७८० उपकेंद्र, तर १९०६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. राज्यात २३ जिल्हा रूग्णालये आहेत. ग्रामीण भागातील ही आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये सर्वसामान्य नागरिकांसाठी खूपच आधार ठरत आहेत. महागड्या उपचाराऐवजी ते सरकारी रुग्णालयात जाणे पसंत करतात. असं राज्यांचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर