मुंबई, ३ ऑगस्ट २०२३ : शरद पवार नुकतेच लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत स्टेजवर उपस्थित होते. त्यावरुन राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. शरद पवार यांनी नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नय़े, असे महाविकास आघाडीचे म्हणणे होते. पण शरद पवार पुरस्कार समितीमध्ये असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आता हाच धागा पकडून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
शरद पवार हे नेहमीच दुटप्पी राहिले आहेत. लग्न एकाबरोबर करतात आणि संसार दुसऱ्याबरोबर थाटतात असे प्रकाश आंबडेकर यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. द्वेष, जातीभेद आणि मृत्यूच्या व्यापाऱ्यांच्या बाजूने तुम्हाला जायचे असेल, तर तुम्ही जाऊ शकता. या तुमच्या ब्रेकअप स्टंटने तुम्ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या लोकांना मूर्ख बनवू नका, अशी टीका प्रकाश आंबडेकर यांनी यावेळी केली आहे.
राष्ट्रवादीच राजकारण हे छुप राजकारण आहे. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशा पद्धतीने ते आहे. एनसीपीचे शरद पवार आणि काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे असे दोघेही होते. आम्ही एनसीपीच्या संदर्भात समजू शकतो. त्यांचे राजकारण हे त्यांच्या घड्याळाप्रमाणे आहे. घड्याळाला पेंडुलम असतो, तो राइट आणि लेफ्टला जातो. एनसीपीच राजकारण काहीवेळा लेफ्ट, काहीवेळा राइटच असते. सध्याच इलेक्शन त्यांच्यासाठी राइटच आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर