पुणे, ३ ऑगस्ट २०२३ : राज्यात सर्व दूर पावसाचे प्रमाण कमी जास्त आहे. परंतु बोगस खते व बियाणे तयार करून शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याचे षडयंत्र जाणीवपूर्वक चालू आहे का? हा प्रश्न सध्या राज्यामध्ये निर्माण झाला आहे. राज्यात अनेक शेतकरी उपासमारी मुळे व प्रचंड कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहेत. यातच या बोगस कंपन्यांची आणखीन भर पडत आहे. काही कंपन्या जाणीवपूर्वक दर्जाहीन खते कीटकनाशके व बी बियाणे तयार करून मोठ्या प्रमाणावर, चढ्या भावाने त्याची विक्री शेतकऱ्यांना करताना दिसत आहेत.अशा बोगस खते ,कीटकनाशके व बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा व शहर यांच्या वतीने कृषी आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
अशा बोगस कंपन्यांवर शासनाचा अंकुश असायला हवा. शेतकऱ्याची परवड थांबली पाहिजे यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गजानन पारधी यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा व शहर यांच्या वतीने कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना लेखी निवेदन देण्यात आले.यावेळी संभाजी ब्रिगेड मध्य जिल्हाध्यक्ष उत्तमबापू कामठे, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, पुणे महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते आदी उपस्थित होते.
पुढील काळामध्ये अशा प्रकारचे बी बियाणे, कीटकनाशके तयार करणाऱ्या कंपन्या विरुद्ध कारवाई करून अशा कंपन्या कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश देण्यात यावेत,आगामी काळामध्ये शेतकऱ्यांसाठी बी बियाणे कीटकनाशके व खते पुरवणाऱ्या कंपन्याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी व शेतकरी राजाला चांगल्या प्रकारचे दर्जेदार खते, बी बियाणे, कीटकनाशके उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर