मुंबई, ९ ऑगस्ट २०२३ : राहुल गांधी यांना पुन्हा संसदेचे सदस्यत्व मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी पुन्हा एकदा देश पिंजून काढणार आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर काँग्रेसने राहुल गांधी यांच्या दुसऱ्या भारत जोडो यात्रेची घोषणा केली आहे. ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे होम पीच असलेल्या गुजरातपासून सुरू होणार आहे. गुजरात ते मेघालय अशी ही यात्रा निघणार आहे.
राहुल गांधी यांच्या यात्रेविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली. राहुल गांधी यांच्या पहिल्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे दुसऱ्या भारत जोडो यात्रेची तयारी सुरू करण्यात आली आहे. ज्यावेळी राहुल गांधी देशात भारत जोडो यात्रा काढतील. त्याचवेळी महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्रातही अशीच यात्रा काढणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी ७ सप्टेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. ही यात्रा १२ राज्यातून गेली होती. या यात्रेची सांगता जम्मू-काश्मीरमध्ये झाली. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी चार हजार किलोमीटर चालले होते. त्यासाठी त्यांना १३६ दिवस लागले होते. तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगना, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्लीमधून ही यात्रा गेली होती.
राहुल गांधी यांची पहिली यात्रा दक्षिणेकडून उत्तरेच्या दिशेने होती. तर दुसरी भारत जिडो यात्रा ही पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने असणार आहे. दरम्यान, ही यात्रा किती दिवस चालणार? किती तारखेपासून सुरू होणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
मोदी आडनावा प्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या उच्च न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यांचा सरकारी बंगलाही काढून घेण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षाच्या या शिक्षेला स्थगिती सुनावली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. तसेच त्यांना बंगलाही परत देण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर