बलात्काऱ्यांना मिळणार आता २१ दिवसात फाशी

हैदराबाद : येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. याच पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश सरकारने “दिशा कायदा” पास केला आहे. याअंतर्गत बलात्काराच्या घटनेनंतर २१ दिवसात दोषीला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाणार आहे. अशी तरतूद आंध्र प्रदेश सरकार करणार असल्याची माहिती समोर आली आहे.अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

सध्या देशात बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद नाही. पण आंध्र प्रदेशचे दिशा कायदा विधेयक पास झाल्यानंतर आंध्र प्रदेश हे बलात्काऱ्यांना फाशी देणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

आंध्र प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यात एफआयआर दाखल झाल्यानंतर २१ दिवसाच्या आत खटल्याच्या सुनावणीबरोबरच दोषींच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. गुरुवारी राज्य सरकार विधानसभेत हे विधेयक सादर करणार आहे. या विधेयकात भारतीय दंड संहीता ३५४ मध्ये संशोधनात्मक बदल करण्यात आले असून नवीन कलम ३५४ (ई) तयार करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी तेलंगाणात डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला जाळण्यात आले. या घटनेनंतर दिशा कायद्याबरोबरच अन्य काही कायदे राज्यात लागू करण्यात आले आहेत. यात महिला व बालकांवरील अत्याचारांचे खटले विशेष न्यायालयात चालवण्यात येण्याची तरतूद आहे.
प्रस्तावित ‘आंध्र प्रदेश दिशा कायदा’ अंतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत ७ दिवसांमध्ये तपास आणि १४ दिवसांमध्ये न्यायालयात खटला चालवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा