कोल्हापूर, १७ ऑगस्ट २०२३ : आपल्या सर्वांचे आदर्श, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वलंत, वास्तववादी व सामाजिक क्रांतीचा इतिहास समजून घेण्यासाठी, त्यांचे समग्र विचार तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी, महामानवांच्या विचारांचा जागर करण्यासाठी शिवराय फुशांबु ब्रिगेड,भगवा फौंडेशन,निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट,आम्ही भारतीय महिला मंच यांच्या वतीने २० ऑगस्ट २०२३ रोजी सायं.५:०० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन,दसरा चौक, कोल्हापूर येथे पहिली छत्रपती शिवराय विचार जागर परिषद आयोजित केल्याची माहिती धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड.करुणा विमल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवराय फुशांबु ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत फडतरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेला साहित्यिक व विचारवंत ॲड.कृष्णा पाटील, शिवराय फुशांबु ब्रिगेडचे नेते ॲड.मंचकराव डोणे, निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने, संपादिका व धम्म चळवळीच्या अभ्यासिका विजया कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागोजीराव पाटणकर हायस्कूल कोल्हापूरचे मुख्याध्यापक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक व विचारवंत शंकर पुजारी यांना छत्रपती शिवराय विचार प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांची पुस्तके असे आहे.
या पत्रकार परिषदेला छाया पाटील, डॉ. शोभा चाळके, हेमंत पवार, डॉ. निकिता खोबरे, प्रा. अमोल महापुरे, नामदेव मोरे, अनिरुद्ध कांबळे, विमल पोखर्णीकर, अरहंत मिणचेकर आदी उपस्थित होते.परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन निमंत्रक छाया पाटील यांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर