रायपूर, ३१ ऑगस्ट २०२३ : छत्तीसगडच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राजधानी रायपूरला पोहोचणार आहेत. या काळात त्या रायपूर आणि बिलासपूर शहरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, राष्ट्रपती मुर्मू आज ३१ ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर छत्तीसगडला येत असून त्यांचा हा पहिलाच छत्तीसगड दौरा आहे.
राष्ट्रपती मुर्मू सकाळी ११.०५ वाजता विशेष विमानाने रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळावर पोहोचतील. माहितीनुसार, त्या सकाळी ११.३५ वाजता शहरातील जगन्नाथ मंदिरात दर्शन आणि आरती कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि नंतर विधानसभेच्या मार्गावर असलेल्या ब्रह्मा कुमारी संस्थानच्या शांती सरोवर रिट्रीट सेंटरमध्ये ‘इयर ऑफ पॉझिटिव्ह चेंज’ कार्यक्रमाचा शुभारंभ करतील.
राष्ट्रपती दुपारी शहरातील महंत घासीदास स्मृती संग्रहालयाला भेट देतील आणि रात्रीची विश्रांती राजभवनात असेल. कार्यक्रमाच्या तपशीलानुसार, राष्ट्रपती मुर्मू दुसऱ्या दिवशी १ सप्टेंबर रोजी सकाळी ९:१५ वाजता बिलासपूरला रवाना होतील आणि गुरु घासीदास विद्यापीठ, बिलासपूरच्या १० व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुपारी बिलासपूरहून परतल्यानंतर राष्ट्रपती राजधानी रायपूर येथील राजभवनात आदिवासी गटांशी चर्चा करतील. राष्ट्रपतींच्या रायपूर आणि बिलासपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड