कोलंबो, ११ सप्टेंबर २०२३: एकदिवसीय आशिया चषक, २०२३ च्या सुपर-४ सामन्यांच्या फेरीत, सर्वात जास्त पाहिला जाणारा सामना प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान असा होता. नेहमीप्रमाणे दुपारनंतर सामन्याला सुरुवात झाली, पावसामुळे अर्धा सामनाही होऊ शकला नाही. आता आज राखीव दिवशी हा रोमांचक सामना काल जिथे थांबला होता त्याच ठिकाणाहून खेळवला जाणार आहे.
रविवारी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. पाकिस्तानचा सर्वात धोकादायक गोलंदाज शाहीन आफ्रिदीला मारायला सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी भागीदारी केली. या दोघांनीही पाकिस्तानला आपला फॉर्म दाखवत चौकार आणि षटकार लगावले. रोहित शर्माने ४९ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या तर शुभमन गिलने ५३ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. सध्या क्रीजवर विराट कोहली ८* धावांवर आणि केएल राहुल १७* धावांवर खेळत आहे.
पावसाने खेळ व्यत्यय आणला तेव्हा भारताने मोठ्या धावसंख्येकडे मजल मारली होती. सामना संपेपर्यंत भारताची धावसंख्या २४.१ षटकात २ गडी गमावून १४७ धावा एवढी झाली आहे. पाकिस्तानकडून शादाब खान आणि शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत प्रत्येकी एक विकेट घेतली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड