कोलंबो, १८ सप्टेंबर २०२३ : श्रीलंकेचा तब्बल १० गडी राखून पराभव करत भारत आशिया चषकाचा बादशहा बनला आहे. भारताने आठव्यांदा आशिया कप विजेतेपदावर कब्जा केला असुन एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. भारताने श्रीलंकेविरुद्धचा सामना २६३ चेंडू शिल्लक असताना जिंकून इतिहास रचला.
तत्पूर्वी, पावसाचा अंदाज असतानाही श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना उशिराने सुरू झाला. श्रीलंकेच्या फलंदाजांना सिराजच्या रूपाने आणखी एका वादळाचा सामना करावा लागला. त्यांच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ १५.२ षटकांत केवळ ५० धावाच करू शकला, जी भारताविरुद्धची वनडेतील त्यांची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.
एका षटकात चार विकेट घेणारा सिराज वनडे इतिहासातील चौथा गोलंदाज ठरला. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात पाच विकेट घेण्याच्या श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वासच्या विक्रमाची बरोबरी केली. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने कुसल परेराला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर सिराजने चौथ्या षटकाच्या पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट्स घेतल्या. पथुम निसांका, सादिरा समरविक्रमा, चारिथ असालंका आणि धनंजय डी सिल्वा हे त्याचे विकेट्स ठरले.
५१ धावांचा पाठलाग करताना भारताच्या इशान किशन आणि शुभमन गिलने शानदार सुरुवात केली. इशान किशन १८ चेंडूत २३ धावा करून नाबाद राहिला तर गिल १९ चेंडूत २७ धावा करून नाबाद राहिला. यासह भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करत ८व्यांदा आशिया कप जिंकला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड