माढा, सोलापूर ८ ऑक्टोबर २०२३ : उसाची काटेमारी करून एका सहकारी साखर कारखान्यापासून ४ ते ५ खासगी साखर कारखाने कारखानदार उभे करतात. साखरसम्राट हे शेतकऱ्यांच्या ऊसापासून नव्हे तर रक्तापासून साखर बनवतात अशी जळजळीत टीका खासदार शेट्टी यांनी मेळाव्यात केली. आढेगाव ता. माढा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या छत्रपती शिवाजी महाराज जनजागृती अभियानांतर्गत मंगळवारी (ता. ३) रोजी आढेगाव (ता. माढा) येथे शेतकरी मेळाव्यात शेट्टी बोलत होते. व्यासपीठावर इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, स्वाभिमानी पक्ष प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, शिवाजी पाटील, तानाजी बागल आदी उपस्थित होते. यावेळी राजू शेट्टी म्हणाले कि, सोलापूर जिल्ह्यात देशातील सर्वाधिक ४६ साखर कारखाने असून, ऊस गाळप आणि साखर निर्मितीतही देशात जिल्हा अव्वल आहे. ऊसापासून २२ पदार्थ तयार केले जातात. त्यापैकी इथेनॉलला सर्वाधिक दर असूनही उपपदार्थांच्या उत्पन्नाचा वाटा शेतकऱ्यांना दिला जात नाही. मात्र साखर कारखानदारांनी एकत्र ऊसदराच्या आडून शेतकऱ्यांची आर्थिक गळचेपी केली आहे. साखर कारखानदार विकासपुरुष नव्हे तर नामवंत दरोडेखोर आहेत. शेतकऱ्यांनो दोष जमिनीचा नाही तर ज्यांच्या ताब्यात ऊस दिला तो दरोडेखोर निघालेला आहे, अशी घणाघाती टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
रिकव्हरी संदर्भात राजू शेट्टी म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात २ ते ३ टक्के रिकव्हरी चोरली जात आहे. त्यामुळे शेतकन्यांचा तोटा सर्वाधिक झाला आहे. १ टक्के रिकव्हरी चोरल्याने ३८५ रुपये प्रतिटन दर कमी मिळतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोल्हापूरपेक्षा ७०० रुपये कमी दर मिळतो त्यामुळे १७५० कोटी रुपयांचे नुकसान ऊसदर कमी दिल्याने झाला आहे.
यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होता. स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, संघटना जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, जिल्हाध्यक्ष युवा आघाडी विजय रणदिवे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, माढा तालुकाध्यक्ष प्रताप पिसाळ, रामभाऊ टकले, दादासाहेब कळसाईत, धनंजय पाटील,निलेश मेटे नानासाहेब मेटे, राजेंद्र बनसोडे, सुरेश गोरे, महेश स्वामी, मनोज बाबर, बाबासाहेब गायकवाड, तानाजी गायकवाड, संतोष नाईकनवरे आदींसह शेतकरी ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : प्रदीप पाटील