पुणे, २० ऑक्टोंबर २०२३ : एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताने गुरुवारी बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला. या शानदार विजयाचा हिरो ठरला विराट कोहली, ज्याने शानदार शतक झळकावले. विराट कोहलीने विजयी षटकार ठोकून आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४८ वे शतक पूर्ण केले. ज्यामुळे भारताने गुरुवारी येथे ५१ चेंडू शिल्लक असताना बांगलादेशचा सात विकेट राखून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत विजयी मोहीम सुरू ठेवली.
रोहित शर्मा (४० चेंडूत ४८ धावा) आणि शुभमन गिल (५५ चेंडूत ५३ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी ८८ धावा जोडून भारताला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर कोहलीची बॅट तळपली आणि त्याने ९७ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांसह नाबाद १०३ धावा केल्या. त्याने केएल राहुल (नाबाद ३४) सोबत चौथ्या विकेटसाठी ८३ धावा जोडल्या आणि भारताची धावसंख्या ४१.३ षटकात ३ बाद २६१ पर्यंत नेली.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला चांगली सुरुवात करूनही आठ विकेट्सवर २५६ धावाच करता आल्या. लिटन दासने ६६ धावांचे, सलामीचा साथीदार तनजीद हसनने ५१ धावांचे आणि महमुदुल्लाहने ४६ धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भारताचा हा सलग चौथा विजय असून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा उंचावल्या आहेत. चार सामन्यांत चार विजय मिळवून भारताने न्यूझीलंडशी बरोबरी साधली असली तरी चांगल्या धावगतीच्या आधारावर न्यूझीलंड संघ अव्वल स्थानावर कायम आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड