राज्यातील कुंभार कारागिरांना मिळाले आधुनिक प्रशिक्षण

बारामती : कुंभार सशक्तीकरण मिशन अंतर्गत आतापर्यंत दोन वर्षांमध्ये देशामध्ये १५ हजार व राज्यामध्ये १५०० कुंभार कारागिरांना यांत्रिक चाके व इतर मशीनचे वाटप करण्यात आलेले आहे.
यानुसार खादी ग्रामोद्योग आयोग भारत सरकार यांच्या कुंभार सशक्तीकरण मिशन अंतर्गत व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांच्या विशेष फंडातून पुणे जिल्ह्यातील कुंभार काम करणाऱ्या १४० कारागीरांना कुंभार कामाचे आधुनिक प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र देण्यात आले.
अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या सहयोगाने शहरातील डेंगळे गार्डन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
यावेळी मुख्य महाप्रबंधक इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मुख्य प्रबंधक श्रीधर भागवत, महा प्रबंधक अनिल लिमये, खादी ग्रामोद्योग आयोगचे संचालक ए.एल.मीना, उपसंचालक राजीव खन्ना, माती कला विकास सेलचे चेअरमन दत्ता कुंभार, अशोक सोनवणे, विठ्ठल राऊत, मोहन जगदाळे, श्‍याम राजे आदी मान्यवरांसह संपूर्ण राज्यातून कुंभार समाज विकास संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
बारामती, भोर, कामशेत, घोडेगाव, पिरंगुट व मुंढवा येथे १० दिवसांचे आधुनिक कुंभारी कलेचे प्रशिक्षण कारागिरांना देण्यात आले. विजेवर चालणारी १४० यांत्रिक चाके तसेच ५ कारागिरांना मिळून १ चिखल मशागत यंत्र व १ चिखल मळणी यंत्राचे वाटप यावेळी करण्यात आले.
या मशीनमुळे कुंभार काम करणाऱ्या कारागिरांचे उत्पादन तीन पट वाढणार असून चिखल बनविणे व इतर कामासाठी लागणारे कष्ट ही कमी होणार आहेत. उपलब्ध असणाऱ्या स्थानिक मातीपासून चांगल्या प्रकारच्या मातीच्या वस्तू बनविता येणार आहेत. याशिवाय ५ कारागिरांच्या समूहामध्ये मातीची भांडी भाजण्यासाठी एक आधुनिक भट्टीही खादी ग्रामोद्योग आयोग बांधून देणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

२००० यांत्रिक चाकांची मागणी
अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेने राज्यातील इतर जिल्ह्यातील कुंभार कारागिरांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई यांच्याकडे या वर्षासाठी आणखी २००० यांत्रिक चाकांची मागणी केली व तसा प्रस्ताव खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई यांना देण्यात आला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांनाही अशा प्रकारचे आणखी प्रकल्प मंजूर करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा