रांची, झारखंड ६ नोव्हेंबर २०२३ : भारतीय महिला हॉकी संघाने, झारखंड महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी रांची-२०२३ चा अंतिम सामना जिंकून आपला विजयी फॉर्म सुरू ठेवला आणि या स्पर्धेत दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले. येथील मरंग गोमके येथील जयपाल सिंग मुंडा अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर रविवारी (५ नोव्हेंबर) झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत यजमान संघाने जपानचा ४-० असा पराभव केला. भारताकडून संगीता ( १७व्या मिनिटाला ), नेहा ( ४६व्या मिनिटाला), लालरेमसियामी (५७व्या मिनिटाला ) आणि वंदना कटारिया (६०व्या मिनिटाला) यांनी गोल केले.
संगीता आणि वंदना यांनी मैदानी गोल तर नेहा आणि लालरेमसियामी यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल केले. कोबायाकावा शिहोने २२ व्या मिनिटाला जपानसाठी गोल केला पण व्हिडिओ रेफरलनंतर तीचा प्रयत्न नाकारला गेला. त्यानंतर ५२ व्या मिनिटाला जपानला पेनल्टी स्ट्रोकही मिळाला पण काना उराटाचा फटका भारतीय गोलरक्षक सविता पुनियाने रोखला.
सुवर्णपदक जिंकल्यानंतर, भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी ३ लाख रुपये आणि प्रत्येक सपोर्ट स्टाफला १.५ लाख रुपये बक्षीस रक्कम मिळाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड