दुबई, संयुक्त अरब अमिराती २३ नोव्हेंबर २०२३ : संयुक्त अरब अमिरातीमध्ये महाराष्ट्रातील मराठी क्रिकेटप्रेमी खेळाडूंची एकमेकांशी क्रिकेटच्या माध्यमातून ओळख व्हावी, आपले क्रिकेट कौशल्य स्पर्धेत दाखविण्याची संधी मिळावी, सुप्तकलागुणांना वाव मिळून ते वृद्धिंगत व्हावेत या उद्देशाने यूएई महाराष्ट्र क्रिकेट क्लब(UMCC) तर्फे, यूएईमधील अजमान विभागात सेव्हन डिस्ट्रिक्ट क्रिकेट मैदानावर टेनिसबॉल एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत एकूण ८ संघांनी भाग घेतला. महाराष्ट्रातील विविध राज्यातील खेळाडू वेगवेगळ्या संघातून खेळत होते. मुंबई, नागपूर, पुणे, अहमदनगर, कोकण, कोल्हापूर, विदर्भ या भागातील यूएईमध्ये कामानिमित्त आलेल्या खेळाडूंनी आपले क्रिकेट कौशल्य या स्पर्धेदरम्यान दाखविले. सकाळी ०७.०० वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत आम्ही रायगडकर, सिंधुपुत्र रॉक्स्टार्स, मुंबई ११, गणेश क्रिकेट संघ, मराठा किंग्स, मराठा ईमिरेट्स, रॉयल मराठा, स्वराज्य वॉरियर्स अशा मराठमोळ्या नावाच्या संघांनी भाग घेतला.
स्पर्धेत प्रत्येकी १० षटकांचे दोन साखळी सामने, त्यानंतर उपांत्य फेरी आणि शेवटी अंतिमफेरी असे स्पर्धेचे आयोजन UMCC तर्फे करण्यात आले होते. अंतिम सामना गणेश मित्रमंडळ DMCC विरुद्ध रॉयल मराठा क्रिकेट क्लब दुबई असा खेळला गेला. ज्यात रॉयल मराठा क्रिकेट क्लब ह्या संघाने ५ गडी राखून आपला विजय मिळवला व २०२३ चा चषक आपल्या नावे केला. रॉयल मराठा संघाचे व्यवस्थापक श्रीधर दत्ताराम तावडे (शिरगाव देवगड) यांनी उत्तम खेळी बद्दल संघाची पाठ थोपटली आणि उत्तरोत्तर अशीच कामगिरी बजावण्याचा सल्ला दिला. रॉयल मराठा संघाचे प्रायोजक आणि कम्युनिटी मेडिकल सेंटर शारजाहच्या मालक डॉक्टर सौ.निधी सिसोडीया यांनी सहकुटुंब दिवसभर आपली उपस्तिथी दर्शवून संघाचे मनोबल वाढवले.
रॉयल मराठा संघाचा कर्णधार सौरभ गौड (वारणा कोल्हापूर) व उपकर्णधार शाहरुख सय्यद (रायगड) यांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत संघाची साखळी सामने ते अंतिम फेरीपर्यंत लढत कायम ठेवली. लढतीमध्ये सिंहाचा वाटा उचलला तो श्रावण सावंत (गडहींग्लज कोल्हापूर) सर्वोत्कृष्ट गोलंदाज, रिझवान (रायगड) सर्वोत्कृष्ट फलंदाज व अविनाश खोत (कुंभोज कोल्हापूर) मॅन ऑफ द सीरिज यांनी. ह्या खेरीज संघात विकास पाटील, निलेश उंबरकर, विशाल मिस्कीन,सुहास नाईक, सज्जाद पटेल, अनिकेत गौड आणि सलमान अशा खेळाडूंचा समावेश होता.
यूएईतील एकमेव स्वामींनी स्त्रियांचा ढोल ताशा पथक तसेच वैशाली सोनार यांचे लेझीम पथक यांनी स्पर्धेची शोभा वाढवली आणि महाराष्ट्रात असल्याचा भास घडवून आणला. नीरज पाटील (सांगली) यांनी आपल्या उत्तम शैलीने कॉमेंट्रीची धुरा सांभाळली. स्पर्धा जिकल्याने रॉयल मराठा क्रिकेट क्लबचे सगळ्यांनी मनःपूर्वकअभिनंदन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर