श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन कामास पंढरपूरात सुरूवात

पंढरपूर १६ डिसेंबर २०२३ : पंढरपूर येथील श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर आणि इतर देवतांची मंदिरे खुप प्राचीन स्वरूपाची आहेत. मंदिरांचे सुशोभिकरण केल्यास, त्याची प्राचीन शैली जपण्यास मदत होणार आहे. शिवाय, सर्व मंदिरे पुरातन असुन त्यांची दुरावस्था होत असल्याने पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार मंदिराच्या सर्वांगीण विकास कामाचा आराखडा वास्तुविशारदाकडून तयार करण्यात आला आहे. यासाठी शासनाने निधीही उपलब्ध करून दिला आहे. यानुसार कामे पूर्ण झाल्यानंतर मंदिरास मुळ प्राचीन रूप प्राप्त होणार आहे. आज बाजीराव पडसाळी येथे पहिल्या टप्प्यातील कामास विधिवत पूजा करून या कार्याची प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आल्याची माहिती श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

सदरचा आराखडा हा पुरातत्व खात्याच्या सल्ल्याने व जिर्णोद्वाराच्या संबंधित आवश्यक त्या सर्व कायद्यातील तरतूदीचा अवलंब करून तयार करण्यात आलेला असून, सदर आराखड्याला मंदिर समिती, जिल्हास्तरीय समिती तसेच मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने, मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर संवर्धन विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली होती.

या आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी पुरातत्व विभागामार्फत ई निविदा राबविण्यात आली होती. त्यामध्ये मे.सवानी हेरीटेज कॉन्झर्वेशन प्रा.लि., मुंबई यांची ई निविदा (रू.२७,४४,११,७६५) मंजुर करण्यात आली आहे. याकामामध्ये मुख्य मंदिर व संकुलातील मंदिराचे जतन संवर्धन, मुख्य विठ्ठल मंदिर (गर्भगृह, चारखांबो, सोळखांबो, अर्धमंडप इ.), रुक्मिणी मंदिर, नामदेव पायरी आणि त्यावरील इमारतीचे नुतनीकरण, महाद्वार व दोन्ही बाजुच्या पडसाळी ५, महालक्ष्मी मंदिर, व्यंकटेश मंदिर, मंदिरातील इतर इमारती (बाजीराव पडसाळ, पश्चिम दरवाजा तसेच मंदिरातील ३८ परिवार देवता, काशी विश्वेश्वर, शनैश्वर, खंडोबा, गणपती, राम मंदिर इ.) मंदिरातील दीपमाला इत्यादी कामे प्रस्तावित आहेत. सदरची सर्व कामे मंदिराच्या मूळ ढाच्यास धक्का न लावता होणार आहेत.

सदर कामाचा उद्घाटन समारंभ उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री श्री.चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्तिकी एकादशीच्या शुभमुहर्तावर गुरूवार, दिनांक २३ नोव्हेंबर२०२३ रोजी पहाटे ३.३० वाजता श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात बाजीराव पडसाळी येथे संपन्न झाला होता. त्यानुसार आज बाजीराव पडसाळी येथे पहिल्या टप्प्यातील कामास विधिवत पूजा करून प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य श्रीमती शकुंतला नडगिरे, श्री.संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ह.भ.प.प्रकाश जवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके, व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड, बांधकाम विभाग प्रमुख श्री.बलभिम पावले व सदर कामाचे ठेकेदार श्री येवले उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : नवनाथ खिलारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा