बदनापूर, जालना २८ मे २०२४ : सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून बदनापूर येथील शासकीय कार्यालयात मात्र पिण्याच्या पाण्याची सोयच नसल्यामुळे शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या ग्रामीण जनतेला पाण्यासाठी भटकावे लागत आहे. यावर्षी उन्हाचा तडाख्यात वाढ झालेली असून आताच तापमान ४० ते ४३ अंशापुढे गेले आहे. सकाळी ९ वाजेपासून उन्हाचा तडाखा वाढून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोठे उन दिसून येते.
बदनापूर येथे विविध शासकीय कार्यालये असून तालुक्याचे मुख्यालय असलेले प्रशासकीय इमारतीत तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, रजिस्ट्री ऑफिस, सामाजिक वनीकरण कार्यालय असे तालुक्यातील कामकाज प्रामुख्याने पाहणारी मुख्य कार्यालये आहेत. त्यामुळे तालुकाभरातून ग्रामस्थ महिला व पुरुष या ठिकाणी विविध कामाकाजासाठी येतात. तसेच महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसताना आता तर चक्क पिण्याच्या पाण्याची सोयही येथे दिसून येत नाही.
पूर्वीच्या काळी काही सामाजिक संस्था, दानशूर लोक पाणपोई लावत होते. मात्र, हळूहळू ही प्रथा बंद पडून आता पिण्याचे पाणीच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. बदनापूर येथील प्रशासकीय इमारतीतही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र शोध घ्यावा लागतो किंवा विकतचे पाणी घ्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासकीय इमारतीत तहसीलदारांनी यांनी पिण्याच्या पाण्याचा तसेच महिला आणि पुरुषांना स्वाछता ग्रहाची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आदिल खान