पुणे २२ ऑगस्ट २०२४ : महाराष्ट्र शासनाने पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालय आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासाठी समान बोधचिन्ह (Logo) आणि घोषवाक्य (Tagline) वापरण्यास शासनाने अध्यादेशाद्वारे मान्यता दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक प्रसिद्धी आता करण्यात येणार आहे. यामुळे देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करणे आणि राज्यातील पर्यटन विकासास चालना देणे हे उद्दिष्ट आहे.
यापुढे पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालय आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यासाठी एकच बोधचिन्ह आणि घोषवाक्य वापरण्यात येणार आहे. पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालय आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांना हा लोगो आणि बोधचिन्ह वापरणे बंधनकारक आहे. त्यानुसार पूर्वीच्या बोधचिन्ह आणि घोषवाक्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी संबंधित कार्यालयांनी योग्य ती कारवाई करावी. तसेच बोधचिन्ह आणि घोषवाक्याच्या वापरामुळे कोणतेही आर्थिक परिणाम होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे नव्या अध्यादेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
सदरच्या बोधचिन्ह आणि घोषवाक्य यांचा पर्यटन विभागाच्या सर्व प्रचारात्मक उपक्रमांमध्ये ठळकपणे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पूर्वीच्या बोधचिन्हे आणि घोषवाक्ये यांचा पर्यटन विभागाव्यतिरिक्त कोणत्याही विभागास वापरण्यास परवानगी नसणार आहे. याबाबत सर्व संबंधित कार्यालयांमध्ये सूचना पाठविण्यात आलेल्या आहेत. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील पर्यटनाच्या वाढीस चालना मिळणार असून राज्याचे पर्यटन क्षेत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाण्यास मदत होणार आहे.
पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज यांची दूरदृष्टी आणि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, तसेच पर्यटन विभाग संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी केलेले प्रयत्न व कुशलतेने हाताळलेल्या बाबी यांमुळे बोधचिन्हा बाबतची विसंगती दूर होउन पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार सुलभतेने करण्यास चालना मिळणार आहे. पर्यटन विभागाचे हे बोधचिन्ह आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्दी पावलेले असल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, निसर्गरम्य स्थळांची आणि नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांची ओळख जगभरातील पर्यटकांना होणार आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : जयश्री बोकील