पुणे पुस्तक महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सक्रिय सहभाग- कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

पुणे १० डिसेंबर २०२४ : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत रंगणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सक्रीय सहभाग घेतला असून, या निमित्ताने उद्या बुधवारी ११ डिसेंबरला होणाऱ्या ‘शांतता …पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमात शैक्षणिक विभाग आणि संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. वाचन संस्कृतीला वाढविण्यासाठी आणि ज्ञानार्जन करण्यासाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल यांनी पुणे पुस्तक महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सोमवारी केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. शिक्षण मंत्रालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका यांच्या सहकार्याने हा महोत्सव होत असून, राजेश पांडे महोत्सवाचे मुख्य संयोजक आहेत. या निमित्ताने १४ डिसेंबरला निघणाऱ्या ग्रंथ दिंडीत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे वाचन संस्कृतीचा जागर होण्यासाठी ‘शांतता….पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम बुधवारी दुपारी १२ ते १ या वेळेत होत आहे. या उपक्रमात पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यापीठाचे सर्व घटक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी व पालक आपल्या आवडत्या पुस्तकाचे वाचन करतील आणि त्याचा फोटो अथवा व्हिडीओसोबत दिलेल्या QR कोड स्कॅन किंवा pbf24.in/register वर तो फोटो/ व्हिडीओ पाठवतील. सोशल मीडियावर #पुणेपुस्तकमहोत्सव यासह पोस्ट करावे, असे आवाहन डॉ. गोसावी यांनी केले आहे. याचाच एक भाग म्हणजे पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या सहाय्याने गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड करण्यात येणार आहे.

पुणे पुस्तक महोत्सवात संशोधक, लेखक, साहित्यिक, कवी, चित्रकार, अभ्यासक यांची मांदियाळी राहणार आहे. या सर्वांना विद्यार्थ्यांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळेल. या महोत्सवात विविध भाषांमधील सुमारे ६०० पुस्तकांची दालने राहणार असून, विद्यार्थ्यांना ती पाहता आणि खरेदी करता येणार आहे. त्याचप्रमाणे या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमात कलावंतांच्या सादरीकरणाचा आनंद घेता येणार आहे. खाद्य महोत्सवात देशातील विविध खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी आहे. त्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल यांनी पुणे पुस्तक महोत्सवात उपस्थित राहून वाचन संस्कृतीला बळकट करण्यासाठी आणि पुणे शहराला नवी ओळख देण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. गोसावी यांनी केले आहे.

या वर्षीच्या पुणे पुस्तक महोत्सवात पुस्तकांच्या मुखपृष्ठांच्या छायाचित्रांचा सगळ्यात मोठा ऑनलाईन अल्बम असा विश्वविक्रम होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी वाचक प्रेमींनी क्यूआर कोड स्कॅन करून किंवा लिंकवर क्लिक करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी केले आहे.

पुस्तकांच्या मुखपृष्ठांच्या छायाचित्रांचा सगळ्यात मोठा ऑनलाईन अल्बम या विश्वविक्रमाविषयी थोडक्यात माहिती

  • आपल्याला पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे छायाचित्र आपल्या मोबाईलच्या साहाय्याने काढून पाठवायचे आहे.
  • ⁠एकावेळी एका छायाचित्रात केवळ एका पुस्तकाचेच मुखपृष्ठचं दिसेल असे छायाचित्र तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने काढून पाठवावे.
  • ⁠या छायाचित्रात पुस्तकाच्या आजूबाजूची चारही बाजूंनी थोडी थोडी जागा सोडून, केवळ पुस्तकाचे मुखपृष्ठ दिसेल असेच छायाचित्र काढावे.
  • ⁠छायाचित्रात पुस्तकाच्या कव्हर आणि चारही बाजूंनी सोडलेल्या थोड्या जागेव्यतिरिक्त अन्य काहीही नसावे.
  • ⁠एकावेळी फक्त एका पुस्तकाचा फोटो काढून पाठवणे असे करीत, एक व्यक्ती एकामागून एक असे कितीही पुस्तकांच्या मुखपृष्ठाचे छायाचित्र काढून वेगवेगळे पाठवू शकतो.
  • ⁠आपल्याकडील अनेक पुस्तके असतील, तर असलेल्या पुस्तकांच्या एकत्रित मुखपृष्ठांचा फोटो काढून पाठवू नये,प्रत्येक पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा वेगवेगळा फोटो काढून पाठवावा.
  • पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा म्हणजेच कव्हरपेजचा फोटो काढताना पुस्तकाचे नाव फोटोत व्यवस्थित वाचता येईल, असाच फोटो काढावा.
  • पुस्तक, पुस्तकाचे नाव नीट वाचता येईल, अशा सपाट पृष्ठभागावर ठेऊन मगच वरून फोटो काढावा म्हणजे नीट फोटो येईल.

न्युज अनकट पुणे प्रतिनीधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा