कटक: कटक येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीजचा ४ गडी राखून पराभव केला आहे. यासह भारताने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ने जिंकली. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना वेस्ट इंडीजने ८ विकेट्सने जिंकला होता. यानंतर दुसर्या वनडे सामन्यात भारताने विजयी संघाला १०७ धावांनी पराभूत करून नेत्रदीपक पुनरागमन केले. कटक येथे झालेल्या मालिकेच्या निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने विंडीजचा पराभव करत मालिका आपल्या नावावर केली.
कटक येथे वेस्ट इंडिजवर झालेल्या या मालिकेच्या विजयानंतर भारताने कॅरेबियन संघाविरुद्ध सलग १० वन डे मालिका जिंकल्या आहेत. कटकच्या बाराबती स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर वेस्ट इंडीज संघाने ५० षटकांत ५ गडी गमावून ३१५ धावा केल्या. सामना आणि मालिका विजयासाठी विंडीजने भारताला ३१६ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल भारताने ४८.४ षटकांत लक्ष्य गाठले.
रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली. २२ व्या षटकात जेसन होल्डरने रोहित शर्माला शाई होपच्या जोरावर बाद केले. रोहित शर्मा ६३ धावा करुन बाद झाला. रोहितने ६३ चेंडूत ८ चौकार आणि एक षटकार ठोकले. लोकेश राहुल ७७ धावा काढून बाद झाला. त्याला अल् होझी जोसेफच्या चेंडूवर शे होपने झेलबाद केले. श्रेयस अय्यर ७ धावांवर बाद झाला. ऋषभ पंत ला (७) चेमो पॉलने बोल्ड केला. यानंतर शेल्डन कॉटरलने केदार जाधव (९) याला बोल्ड केले.
दरम्यान, निकोलस पुरन आणि कर्णधार किरॉन पोलार्ड यांच्या दमदार खेळींच्या जोरावर विंडीजने भारताला ३१६ धावांचे तगडे आव्हान दिले. पुरनने ६४ चेंडूंत ८९ धावांची खेळी साकारली. यामध्ये १० चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तर पोलार्डने धडाकेबाज नाबाद ७४ धावांची खेळी केली. पोलार्डने आपल्या खेळीत तीन चौकार आणि ७ षटकार लगावले. होपने ४२, चेसने ३८ धावांची खेळी साकारली.