पुणे : सध्या शिवाजीनगर परिसरात मेट्रोच्या कामामुळे प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ट्रॅफिकही प्रचंड होत आहे. या मेट्रोच्या कामामुळे एस.टी. बसेसचे शिवाजीनगर स्थानकाचे स्थलांतर करण्यात आले आहे. या स्थानकातून होणारे संपूर्ण संचलन आजपासून वाकडेवाडी बसस्थानकातून करण्यात येणार आहे. तसेच सर्व बसेसचे वेळापत्रक “जैसे थे” च राहणार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाकडेवाडी स्थानकाचे काम महामेट्रोकडून करण्यात येत होते. मात्र, स्थानकाच्या अंतर्गत ठिकाणी फलाटाच्या कामांसह अन्य काही कामे रखडल्याने तेथून पूर्ण संचलन सुरू नव्हते. दिवाळीपासून काही बसेस वाकडेवाडीतून सोडण्यास सुरूवात झाली होती. आता चार दिवसांपूर्वी स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शिवाजीनगरहून होणारे एस.टी.चे संपूर्ण कामकाज वाकडेवाडीतून होणार आहे.
शिवाजीनगर बस स्थानकातून दररोज सुमारे पाचशेहुन अधिक एसटी बसेस ये-जा करतात. या सर्व बसेस आजपासून वाकडेवाडी येथून सोडण्यात येणार आहेत. यामध्ये नाशिकला जाणाऱ्या ४२, औरंगाबादला जाणाऱ्या २६ विनावाहक बसेसचा समावेश आहे. तर इतर बस विविध ठिकाणी जाणाऱ्या आहेत. मेट्रोच्या भूमिगत स्थानकाच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानक हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पर्यायी जागांची चाचपणी एसटी प्रशासनाने करुन वाकडेवाडीची जागा निश्चित करुन संचलन सुरू होत आहे.