सांडपाणी प्रक्रीया नसणाऱ्या प्रकल्पांचे परवाने रद्द करा !

दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील औद्योगीक क्षेत्रातील विश्वा लँबोरेटरी या प्रकल्पातून उघड्यावर सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्याची तक्रार झाल्याने प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी येऊन परिस्थितीची पाहणी केली.

यामध्ये या प्रकल्पाला “झिरो डिशचार्ज” चा दर्जा असल्याने कुठल्याही प्रकारे पाणी बाहेर न सोडण्याचे आदेश आहेत. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात सांडपाणी उघड्यावर सोडले जात आहे. कुरकुंभ सामुहिक सांडपाणी केंद्रात देखील या प्रकल्पाचे सांडपाणी अतिशय घातक असल्याने स्वीकारले जात नाही. परिणामी हे सर्व घातक सांडपाणी राजरोसपणे उघड्यावर सोडले जात होते.
कुरकुंभ येथील औद्योगीक क्षेत्रातील काही प्रकल्प राजरोसपणे प्रक्रिया न केलेले रासायनीक सांडपाणी रात्रीच्या वेळेस उघड्यावर सोडण्याचा प्रताप करीत आहे. परिणामी परिसरातील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढताना दिसून येते. कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील अनेक प्रकल्पांना झिरो डिशचार्ज म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकल्पातील कुठल्याही प्रकारे पाणी, सांडपाणी बाहेर सोडण्याची परवानगी नाकारली जाते. मात्र सध्या अशा परवानगीच्या नावाखाली अनेक प्रकल्प पाणी सोडत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
विश्वा लँबोरेटरीच्या माध्यमातून एका महिन्याला जवळपास सहा लाख लिटर पाण्याचा वापर केला जात आहे. मात्र उत्सर्जित होणारे रासायनीक सांडपाणी प्रक्रिया नसताना कुठे जाते याचे याबाबत काहीच स्पष्टीकरण प्रकल्पाकडून दिले जात नाही. सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने देखील उत्सर्जित पाणी नाकारल्याने प्रकल्पातील पाणी उघड्यावर सोडले जात असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. प्रदूषण मंडळाचे यावर नियंत्रण राहिले नसुन कर्मचारी अभावी पूर्ण क्षमतेने काम करता येत नसल्याचे कारण पुढे करून वेळ मारली जात आहे.
कुरकुंभचे सरपंच राहुल भोसले यांच्या प्रदूषण विषयक निवेदनावर खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना लक्ष घालण्यास सांगितले आहे. मात्र यापूर्वी अनेक वेळा अश्या घटना घडून जातात. बैठका होतात मात्र काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा