पुणे: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा तर्फे म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची फायनल मोठ्या चुरशीच्या वातावरणात पार पडली.
गादी व माती अशा दोन्ही विभागातून अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीतील मल्ल हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके मंगळवारी महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाड्यात आमनेसामने होते.अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात हर्षवर्धनने ३-२ अशी बाजी मारली.
३-२ अश्या फरकाने हर्षवर्धन सदगीर याने हि बाजी मारली. अत्यंत खिलाडू वृत्तीचे दर्शन या कुस्तीनंतर पाहायला मिळाले. अतिसामन्यात पराभूत झालेल्या शैलेश शेळके याला हर्षवर्धन सदगीरने आपल्या खांद्यावर उचलून घेत अवघ्या महाराष्ट्राचे मन जिंकून घेतले.
शैलेश आणि हर्षवर्धन हे एकाच तालमीत शिकत असल्यामुळे दोघांनाही एकमेकांची बलस्थानं आणि कच्चे दुवे माहिती होते. पहिल्या डावात दोघांनीही बचावात्मक खेळ केला. अति बचावात्मक कुस्ती खेळल्यामुळे पंचांनी शैलेश शेळकेला एक गुण बहाल केला.
दुसऱ्या डावातही दोन्ही मल्ल एकमेकांना वरचढ होण्याची संधी देत नव्हते. दुसरा डाव संपायला येत असताना हर्षवर्धननेही एक गुण कमावत बरोबरी साधली. मात्र शेवटच्या १-० सेकंदात हर्षवर्धनने निर्णयाक डाव टाकत महत्वाच्या दोन गुणांची कमाई करत मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.