अमरावती, २५ सप्टेंबर २०२२ : अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे रुग्णालयातील लहान मुलांच्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागली. यावेळी तात्काळ अग्निशामक दल रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालय प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतल्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लहान मुलांच्या आयसीयू वार्डामध्ये ही आग लागल्यामुळे, येथे असलेल्या लहान मुलांना ताबडतोब दुसऱ्या वार्डामध्ये हलवण्यात आले. वेळीच काळजी घेतल्यामुळे सुदैवाने यावेळी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. परंतु या आगीमध्ये दोन मुले किरकोळ जखमी झाली आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना तातडीने येथील पंजाबराव देशमुख रुग्णालयात नेण्यात आले आहे.
सदर घटनेनंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रुग्णालयाला भेट दिली. या ठिकाणी पाहणी करून झालेल्या घटनेची माहिती घेतली. भेट दिल्यानंतर नाना पटोले यांनी आरोग्य यंत्रणेचेही आभार मानले.
रुग्णालय भेटीनंतर नाना पटोले यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की विदर्भात सहा जिल्ह्यांना एकच पालकमंत्री आहे. प्रशासन आणि शासन या दोन्ही गोष्टीच्या समन्वयाचा अभाव आहे. शासन आपली भूमिका स्पष्ट करत नाही. त्यामुळे या सरकारकडून लोकशाहीची थट्टा केली जात आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री स्पायडरमॅनसारखे गतीने काम करणार का? असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर