नागपूर, १० सप्टेंबर २०२२ : संपूर्ण राज्यभर यावर्षी मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे, शहरातील रस्त्यांची अक्षरशा चाळण झालेली आहे. दिवसेंदिवस ठिकठिकाणी वेगवेगळे अपघात झाल्याचे समोर येत आहे. अशातच आता नागपुरमध्ये आणखी एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये कार आणि दोन दुचाकींचा गंभीर अपघात झाला आहे. यामध्ये कार आणि दुचाकीच्या धडकेत चौघांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात नागपूर मधील सक्करदरा उड्डाण पुलावर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दहाच्या दरम्यान नागपूर मधील सक्करदरा फुलावर हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये अनियंत्रित चारचाकी कारने दोन दुचाकींना जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील चार जण उड्डाण पुलावरून खाली ७० ते ८० फूट उंचीवरून खोल खालच्या रस्त्यावर फेकले गेले.
दुचाकीवर चार प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश होता. धडक देणारी कार आवारी चौकाकडून भांडे प्लॉट चौकाकडे जात होती. त्याच दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला कारने जबरी धडक दिली. घटनेनंतर पोलिसांनी धडक देणाऱ्या चारचाकी कारच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती कार मालकाचा ड्रायव्हर असल्याची माहिती समोर येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर