पुण्यातील मांजरी बुद्रुक वतन जमिन प्रकरणी आम आदमी पक्ष करणार जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन

पुणे, ८ ऑगस्ट २०२२ : पुण्यातील मौजे मांजरी बुद्रुक येथील सर्वे नं २,५,२४ ही महार वतन जमिन, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेस एक रूपाया वार्षिक या नाममात्र दराने, तीस वर्षांसाठी शासनाने कराराने दिली आहे. परंतु आता मूळ वतनदार जमिन मालक हा करार रद्द करावा व जमीन त्यांना परत मिळावी यासाठी मागणी करत आहेत.

मौजे मांजरी बुद्रुक येथील स्थानिक बागायतदार यांनी महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस फेरफार नोंदवला आहे आणि सातबाऱ्यावर सदरील नावे लावली आहेत. राहुल गुलाब चौधरी या बिल्डरने मूळ हिस्सेदारांचे कायदेशीर वाटप ठरलेले नसताना, स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी गुंठेवारी लॉट पाडले आहेत. तसेच या ठिकाणी बेकायदेशीर बांधकामही केले असल्याचा आरोप मूळ वतनदार जमिन मालकांनी केलाय.

सदर प्रकरणी शासनाचा अहवाल प्रलंबीत असताना जवळ जवळ ९४ एकर बागायती जमीन जिचे मूल्य हजारो कोटींमध्ये जाते, ही जमिन लाटली गेलीय. आता या प्रकरणाची ईडी चौकशी व्हावी तसेच मा.मुख्यमंत्र्यांनी सदर गंभीर प्रकरणाबाबत मंत्रालय स्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करावी आणि दोषींवर ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अन्यथा आम आदमी पार्टी व मूळ वतनदार जमिन मालक १० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करेल, असे आम आदमी पार्टी व मूळ वतनदार जमिन मालक यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा