बिहारमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग

पटना, १३ नोव्हेंबर २०२० : बिहारमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितिश कुमार दिवाळीनंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु झाली आहे, असे पक्षाचे सरचिटणीस के.सी. त्यागी यांनी सांगितले.पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांशी नितिश कुमार यांनी चर्चा केली असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांशीही चर्चा सुरु आहे, असे ते म्हणाले.

हिंदूस्थानी आवामा मोर्चाचे अध्यक्ष जितेन राम मांझी यांनी आज त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांसह नितिश कुमार यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. मात्र आपण स्वतः मंत्रिमंडळात सामील होणार नसल्याचे मांझी यांनी नंतर बातमीदारांशी बोलताना सांगितले.

त्याआधी विकासशील इन्सान पार्टीचे अध्यक्ष मुकेश सहानी यांनीही नितिश कुमार यांची भेट घेतली. या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी चार आमदार निवडून आले आहेत.राष्ट्रीय जनता दल आणि डावे पक्ष तसेच काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका सुरु आहेत. या सर्वांच्या एकत्र बैठकीत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची महाआघाडीचे नेते म्हणून निवड झाली.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्तांनी बिहार विधानसभेतल्या नवनिर्वाचित २४३ सदस्यांची यादी राज्यपाल फागू चौहान यांना दिले आहेत. बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या २९ तारखेला संपत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा