बुलढाणा, ३ जून २०२३ : बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरामध्ये शेतकऱ्यांना जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कृषी अधीक्षकांनी कारवाई केली आहे. खामगाव शहरातील अंकुर कृषी केंद्रावर ३६०० रुपये छापील किंमत असलेल्या सोयाबीनच्या बियाणाची तब्बल ४२०० रुपये दराने विक्री केली जात होती. हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या केंद्रात जाऊन याविषयी आवाज उठवला. त्यानंतर दोन दिवस कृषी केंद्रावर आणि गोडाऊनवर कारवाई सुरू होती. या कारवाईनंतर कृषी अधिक्षकांनी या कृषी केंद्राचा परवाना निलंबित केला आहे. त्याचबरोबर कृषी केंद्र आणि तीन गोडाऊन मधील तब्बल दीड कोटी रुपये किमतीचे बियाणे गोडाऊनमध्ये सील केले आहे. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मागील दोन महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांसोबतच जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली असल्यामुळे शेतकरी आता भुईमूग पिकाच्या चारा अधिक घेत आहे. परंतु भुईमूग पिकाचा चारा देखील महागला आहे. एका ट्रॉलीसाठी आठ ते दहा हजार रुपये मोजावे लागत आहे.
मान्सूनपूर्वी होत असलेल्या मशागतीच्या कामांसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. तर दुसरीकडे शेती पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी विवंचनेत आहे. तर खरीप हंगामासाठी बी,भरण आणि खतांसाठी पैसे कुठून आणायचे यासाठी शेतकरी वर्ग चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर