अहमदनगर, १७ सप्टेंबर २०२३ : अहमदनगरचा युवा स्केटर कार्तिक रत्नेश मिश्रा याने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी करून सुवर्णपदक पटकावले आहे. त्याच्या प्रशंसनीय खेळामुळे कार्तिक मिश्रा २१ वर्षे वयोगटात देशातील अव्वल खेळाडू ठरला. त्यामुळे कार्तिक मिश्राची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत स्कूल गेम अँड अॅक्टिव्हिटी डेव्हलपमेंट फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यातील खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत नगरचा युवा खेळाडू कार्तिक मिश्रा याने प्रथम क्रमांक पटकावला.
आता कार्तिक मिश्रा नेपाळमध्ये २० सप्टेंबरपासून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. शहरातील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलचा विद्यार्थी कार्तिक हा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. कार्तिकने स्केटिंग प्रशिक्षक दिवंगत मनोज करपे यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. सध्या कार्तिक भारती विद्यापीठ, पुणे येथे स्थापत्य अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत आहे. कार्तिक मिश्राची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड