पुणे,२ ऑगस्ट २०२३ : उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचा दौरा आटोपून जाताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांना कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून झळकावले जाणाऱ्या बॅनर्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी आपले मत मांडले. विशेष म्हणजे अजित पवार यांना यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कधी विराजमान होणार? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्रीपदाबाबत स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी नेमके काय ठरले आहे ते मीडियाला सांगितले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत. तर आम्ही दोघे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला मिळालेली जबाबदारी तर नीट पार पाडू द्या, असे अजित पवार म्हणाले. कार्यकर्त्यांचे समाधान होण्याकरता त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावले असावेत. नाहीतर त्यांनी बॅनर लावून समाधान मानावे. त्यांना समाधान मिळाले, ठिक आहे, असेही अजित पवार म्हणाले.
यावेळी अजित पवार यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये काम केले. दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात काय फरक वाटतो? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर प्रत्येकाचे काम आपापल्या परीने वेगळे आहे. आता तुम्ही पत्रकार म्हणून प्रश्न विचारता, दुसरे विचारता, प्रत्येकाची विचारण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे आपण ज्यांच्याबरोबर काम करतो तिथे विश्वासाने काम करायचे अशी माझी पद्धत आहे. त्यापद्धतीने मी उद्धव ठाकरे यांच्याही बरोबर काम केले. तसेच आता एक महिना होईल, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करतोय. त्यांच्याबरोबरही तेवढ्याच विश्वासाने काम करतोय, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? यावर अधिवेशनच्यानंतर विस्तार होण्याची शक्यता आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पण शेवटी हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात तसे काही असेल तर ते करतील, असे उत्तर अजित पवार यांनी दिले. यावेळी आणखी एका पत्रकाराने दादा मुख्यमंत्री कधी होणार असा प्रश्न विचारला, त्यावर अजित पवार यांनी मिश्किलपणे उत्तर दिले की, अरे आता चाललेय ते सरकार चालू दे ना बाबा. यावेळी पत्रकारांच्या बऱ्याच प्रश्नांना अजित पवारांनी उत्तरे दिली.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर