हडपसर महापालिकेसाठी सर्वपक्षीय एकवटले ; ‘ब’ दर्जासाठी आग्रही

पुणे, ५ एप्रिल २०२३: हडपसर पूर्व भागासाठी नवीन स्वतंत्र महापालिका होण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. पूर्व भागाच्या विकासासाठी ही महापालिका झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडत यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार राजकीय नेते व विविध संघटनांच्या बैठकीत करण्यात आला. राज्य सरकारने पूर्व हडपसर ही स्वतंत्र महापालिका स्थापन करण्यासाठी पुणे महापालिकेकडून अभिप्राय मागविला आहे. या पार्श्वभूमीवर हडपसर येथे मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीत आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास तुपे, हडपसर भाजीपाला सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण तुपे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, योगेश ससाणे, गणेश ढोरे, राहुल शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले आदी उपस्थित होते.

आमदार तुपे म्हणाले हडपसरलगत गावांच्या विकासासाठी ‘ब’ दर्जाची महापालिका होण्यासाठी मी सातत्याने विधानसभेत प्रश्न लावून धरला आहे. पूर्व भागाच्या विकासासाठी स्वतंत्र महापालिकेची आवश्यकता आहे. प्रवीण तुपे म्हणाले वाढत्या लोकसंख्येमुळे पुणे महापालिका हडपसर व उपनगरांतील गावांचा विकास करु शकणार नाही. त्यामुळे हडपसरपासून वाघोली, उरुळी कांचनपर्यत नवीन ‘ब’ दर्जाची महापालिका झाली पाहिजे. यासाठी आम्ही नागरिक कृती समिती तयार करून मागणी करीत आहोत असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा