छत्रपती संभाजीनगर (पाचोड ), १९ मार्च २०२३: पैठणच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनिता वानखेडे यांच्या विरोधात पैठणचे तात्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या पत्नी अर्चना शेळके यांनी छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रार अर्ज दाखल केलाय. दिलेल्या तक्रारीत असं म्हटलं की,अनिता वानखेडे या मागील काही महिन्यांपासून माझे पती चंद्रकांत शेळके, यांच्या विरोधात विविध कार्यालयामध्ये खोट्या तक्रारी व निवेदन देत आहे. माझे पती आत्ता पैठणला नसताना सुद्धा आमच्या कुटुंबाची बदनामी होईल या उद्देशाने त्या राष्ट्रवादी पक्षाचे लेटर हेड वापरून अशा तक्रारी करत आहेत.
तसेच मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या अनिता वानखेडे या माझ्या राहत्या घरी आल्यावर “मला प्रचारासाठी पैसे लागतात. ते तुम्ही द्या” अशा म्हणू लागल्या. “मी त्यांना त्यावेळी पैसे दिले नाही” म्हणून त्या माझ्या पतीच्या विरोधात सतत खोट्या तक्रारी व निवेदन देत असतात. या संदर्भात मी रीतसर तक्रार दिली असल्याचं अर्चना शेळके यांनी सांगितलं.
अनिता वानखडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, माझी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या विरोधात पाच ते सहा तक्रारी दाखल आहेत, त्यापैकी कोणती तक्रार खोटी आहे.हे त्यांनी मला दाखवावं. तसंच मी पैसे घेतल्याचं त्यांचं म्हणणं असंल तर त्यांनी पुराव्यानिशी ते सिद्ध करावं. मी या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया अनिता वानखेडे यांनी दिलीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: विनोद धनले